सागरा ....... प्राण तळमळला







सागरा ....... प्राण तळमळला





                       स्वातन्त्र्य वीर विनायक दामोदर सावरकर.... स्वातंत्र्य संग्रामातिल स्वातंत्र्याचा मेरुमणी........ अर्थात स्वातंत्र्य वीर . तेज , मनोनिग्रह , रखरखता अंगार म्हणजे स्वातंत्र्यवीर. तपस्विची प्रगल्भता , प्रयत्नातील सातत्य म्हणजे स्वातंत्र्यवीर. प्रगल्भ भाषा , धगधगते विचार, काळजाला भिडणारे शब्द , विचारांवर ज्वाजल्य श्रद्धा म्हणजे स्वातंत्र्यवीर. स्वदेश, स्वधर्म आणि मात्रूभूमि वरिल निष्ठा म्हणजे स्वातंत्र्यवीर. साहित्य , भाषा , इतिहास , राजकारण, समाजकारण यांचा सुंदर मिलाफ म्हणजे स्वातंत्र्यवीर. एका अर्थाने स्वातंत्र्यवीर नाही तर स्वातंत्र्य योगी सावरकर.
                      या पवित्र मात्रूभूमिवर अगाढ प्रेम, निष्ठा   श्रद्धा असलेली व्यक्ति जेव्हा या मात्रूभूमिसाठी सर्वस्व पणाला लावण्याची बालपणी शपथ घेते आणि ती शपथ स्वत:चे प्रायोपवेशन करून पूर्ण करते तेव्हा कदाचित या मात्रूभूमिलाही आपण हे रत्न उदयास घातले याचा अभिमान वाटला असेल.
            हे  मात्रूभूमि, तुजला मन वाहियेले
           वत्रुत्व वाग्भि भवही तुज अर्पियेले
         तूतेचि अर्पिली नवी कविता रसाला
          लेखांप्रति विषय तूचि अनन्य झाला
                        आज सावरकरांची  137 वी जयंती . अतुलनिय बुद्धिमत्ता लाभलेल्या तात्यारावानी त्यांच्या स्वभावाला अनुसरूनच पारतंत्र्या विरोधात लढण्यासाठी  सशस्त्र क्रांतीमार्गाचा अवलंब केलेला होता. परंतु ही क्रांती कोणाविरुद्ध आहे, कशासाठी आहे यांचा तोल  सांभाळ्ण्याची विवेकी क्षमता त्यांच्यामध्ये होती. तिचा परिणाम म्हणून लंडनच्या इंडिया हाउस ला विद्यार्थी दशेतच त्यांनी आपल्या कार्याची प्रयोगशाळा बनविली. मित्रमेळा नंतरच्या अभिनव भारत च्या कार्याचा अनुभव पाठीशी होताच. एक राष्ट्रवादी विचारांचा विद्यार्थी परदेशात जाऊन तिथल्या सरकारला धोका ठरू शकतो यावरून सावरकरांचे सामर्थ्य प्रत्ययास येवू शकते. तिथून भारतात बंदी म्हणून येताना मार्सेलिस ची उडी म्हणजे धाडसाचे शौर्याचे दुर्मिळ उदाहरण .  भारतात परतल्यावर अंदमानला झालेली कैद , काळ्या पाण्याची शिक्ष , दोन जन्मठेपी हा एवढा मोठा प्रसाद वाट्याला आला तो केवळ मात्रूभूमिच्या स्वातंत्र्यासाठीचा प्रयत्न म्हणूनच . अंदमानातल्या मरणयातना भोगताना त्यांनी जवळ्जवळ एक तप एवढा काळ आपली स्थितप्रज्ञता जराही ढळू दिली नाही. याही नरकवासात अपल्या अंगी असलेल्या प्रतिभेला त्यांनी जिवंत ठेवली अंदमानातील तुरूंगाच्या भिंतिंवर आपल्या काव्यपंक्ती ….  छे छे ……. आपल्या असामान्य अस्तित्वाच्या खुणा कोरून ठेवल्या .
                        1857 च्या उठावाला राष्ट्रिय उत्थान संबोधून सावरकरानी त्याला भारताचे पहिले स्वातंत्र्य समर  म्हटले. आजवरच्या तथाकथित इतिहासकारानी, इंग्रजाळलेल्या विचारवंतानी भारतीय इतिहासाला परकीय आक्रमणाचा गुलामीचा इतिहास असे संबोधले तेव्हा सावरकरानी इतिहासाची सहा सोनेरी पाने यामधून प्रत्त्यूत्तर देण्याचा स्तुत्त्य प्रयत्न केला.  रत्नागिरीतील स्थानबद्धतेच्या काळात भेदाभेद विच्छेद, पतितपावन मंदिर स्थापना, सामूहिक स्नेहभोजन अशा सामाजिक कार्यात स्वत: कार्यरत ठेवले. भाषाशुद्धि चळवळ असो, स्वदेशीचा पुरस्कार असो किंवा हिंदुत्वाची विचारसरणी असो, प्रत्येक वैचारिक प्रांतामध्ये आपले परखड, विज्ञान निष्ठ, विवेक पूर्ण  चिंतन चालू ठेवले.
                        आसिंधु सिंधु पर्यंता , यस्य भारत भूमिका
                        पित्रूभू पुण्यभू श्चैव हिंदु रीति स्म्रूत:
                         हिंदुत्वाची ही त्यांची  व्याख्या म्हणजे एक शोधनिबंध ठरू शकेल. यातील प्रत्येक शब्द हा राष्ट्रीयत्वाची परिभाषा अधिक व्रुधिंगत करतो. यामध्ये धार्मिक भेदभाव अजिबात नाही , नव्हे असूच शकत नाही. पण यावर  तथाकथित पुरोगाम्यांचे विश्लेषण म्हणजे एखाद्या कवीने शास्त्रीय प्रमेय सोडवण्या सारखेच असते. कारण अशा हेतुपुरस्पर केल्या गेलेल्या हिंदुत्वया संकल्पणेच्या मतमतांतरांची पर्वा करता याल तर तुमच्यासह , याल तर तुमच्या विना ….  यासारखी  सिंहगर्जना तात्यारावांच्या मुखी येवू शकते.
                         आज मराठीतील अनेक शब्द जसे की महापौर , यासारख्या शब्दांचे प्रणेते हे तात्याराव ठरतात. जगप्रसिद्ध काव्य कमला’ , नाटक सन्यस्त खडग’, आत्मव्रूत्त माझी जन्मठेप’ , वैचारिक हिंदुत्वया तात्यारावांच्या साहित्य क्षेत्रातील भरार्या त्यांच्या विचारांचा अमूल्य असा ठेवा ठरतो. “ तुजसाठी मरण ते जनन ….. ; ने मजसि ने परत  मात्रूभूमिला …..  या काव्यरचना त्यांच्या कविमनाची साक्ष देतात.
                        अस म्हणतात की क्रांती ही आपल्याच पिलाना खाउन टाकते . पण स्वातंत्र्याच्या या क्रांति यज्ञामध्ये ज्यानी आपले सर्वकाही अगदी सर्वकाही ….. अर्पण केले, अशा क्रांतीच्या उद्गात्याला , प्रत्यक्ष क्रांतिसुर्याला क्रांति संपवू शकली नाही. अगदी सावरकरांच्या  शब्दात-
                   त्वत्स्थंडिलावरि बळी प्रिय बाळ झाला
                  त्वत्स्थंडिली बघ आता मम देह ठेला
                  हे काय बंधू असतो जरि सात आम्ही
                  त्वत्स्थंडिलीच असते दिधले बळी मी
परंतु दुर्दैव असे की ज्याना  प्रत्यक्ष इतिहास हरवू शकला नाही त्याना या क्रांतिच्या उपासनेमुळे स्वातंत्र्याचे आशिर्वाद , वरदान प्राप्त झाले त्यातील काही पिलानीच पुर्वग्रहावर आधारित विचारामुळे म्हणा किंवा स्वार्थामुळे म्हणा सावरकराना दूष्ट , धर्माभिमानी ठरवण्याचा प्रयत्न केला. वास्तविकत: ज्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सावरकरांनी सर्वस्व अर्पण केले त्याच देशात स्वातंत्र्या नंतर त्यांची अवहेलना करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांच्यावरील मोठा आघात म्हणजे गांधी हत्येतील सहभागाचा आरोप.
                  की घेतले व्रत हे आम्ही अंधतेने
                  लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने   
                 जे दिव्य दाहक म्हणूनि असावयाचे
                 बुद्ध्याचि वाण धरिले करि हे सतीचे
            आपले स्वातंत्र्यसमर   म्हणजे सतीचे वाण असे  संबोधून समस्त जीवनाची आहुति ज्या अग्निकुंडात समर्पिलि अशा साधकास ही मिळालेली दुर्दैवि पोचपावती होती. तरीही त्यांचा गांधी हत्येतील सहभागाचा आरोप , ज्यातून न्यायदेवतेने त्याना निर्दोष सिद्ध केले आहे , अजुनही काही बालबुद्धीचे लोक करतच असतात. “द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत” जो अलिगढ वीद्यापीठातून आणि मुस्लिम लीग च्या स्थापने नंतर ऐतिहासिक द्रुष्ट्या या देशात सिद्ध झालेला होता, त्याचे  “अस्तित्व आहे” हे  तात्यारावानी मान्य केले होते. पण या  सिद्धांताचे जनक म्हणून त्यांची गणना केली गेली हे या देशाचे दुर्दैव होय. त्यांची हिंदुत्वाची व्याख्या ही धर्मातीत असून देखील केवळ त्या विचारातील भव्यता आणी आशय ज्या सामान्य बुद्धीच्या विरोधकाना कळली नाही, त्या तथाकथीत विचारवंतानीच त्यांच्या कुवतीनुसार यामध्ये धर्म शोधला. स्वातंत्र्य चळवळीतील  त्यांचे वैचारीक विरोधक पुष्कळ कार्यकर्ते नेते ज्याना थोडाफार तुरुंगवास तर झाला पण ज्याना सकाळी नाष्ट्यात काय हवे, वर्तमानपत्र कुठले हवे अशी बडदास्त तूरुंगात ठेवली जायची , त्याना अंदमानच्या काळ्या पाण्याची शिक्षा कधीच कळणार नव्हती. त्या अंदमानातून एक कैदी जिवंत बाहेर येतो, आपली बुद्धी प्रतिभा कायम ठेवू शकतो नव्हे ऊत्तरोत्तर व्रुद्ढींगत करतो, समाजाच्या परिस्थीतीवर नेमके परखड विश्लेषण करून कार्यरत होतो, स्वधर्मातील आचरणीवर विवेकपुर्ण विज्ञान निष्ठ विवेचन करतो अशा व्यक्तीबाबत इतराना असूया वाटणे साहजिकच. पण त्यांची माफीवीर म्हणून निर्भत्सना करणे महणजे शुद्ध निर्लज्जपणाच होय.
           गांधी हत्ये नंतरच्या दंगली मध्ये ज्यानी आपल्या घरातील तरूण व्यक्तीवर दगडांचा केलेला हल्ला बघितला त्या सावरकरानाही एकवेळ वाटले असेल यासाठीच का केला होता अट्टाहास ? ‘ पण तरीही 1965 च्या युद्धात मिळालेल्या विजयानंतर स्वत: धन्य मानून आपल्या जीवनाचे कार्य संपले असे ठरवून प्रायोपवेशनाने देहत्याग करणारी त्यांची व्रूत्ती ही कुठल्याही ऋषी वा योगी व्यक्तीचीच असू शकते. म्हणून त्याना स्वातंत्र्य योगीही उपमा सर्वथा योग्य ठरते.
           सावरकरांचे सम्पूर्ण आयुष्य हेच एक समरांगण ठरले. भारतापासून दूर असताना भारतमातेच्या आठवणीनी व्याकूळ होवून ने मजसि ने ,परत मात्रूभूमिला ; सागरा , प्राण तळमळला …. अशी आर्त साद त्यानी समुद्राला घातली होती. स्वातंत्र्या नंतर त्याच   मात्रूभूमिला सावरकरांची होनारी उपेक्षा पाहून काय वाटले असेल?  प्रत्यक्षात कुठलीही अपेक्षा , लोभ या स्वातंत्र्य योग्याने कधीही धरला नीही , तरीही त्यांची केलेली जाणीव पूर्वक अवहेलना पाहून मात्रूभूमिचाही कंठ फुटला असेल. तिनेही हुंदके दिले असतील. ती  ही त्याच व्याकूळतेने , आर्त भावनेने पिडीत होत असेल, आणी त्याच सागराला कदाचित साद घालत असेल
                               सागरा , प्राण  तळमळला       S S
                               ………………….   सागरा , प्राण  तळमळला ! !
            
-          शिवानंद बुटाले .

SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments: